लहान मुलांना नवीन सवयी कशा लावायच्या?
काही दिवसांपूर्वी मी एका ६ वर्षाच्या मुलाच्या पालकांशी बोलत होतो. तेव्हा त्यांनी मला विचारलं की, “काही चांगल्या नवीन सवयी जर आम्हाला आमच्या मुलाला लावायच्या असतील, तर त्या कशा लावायच्या? आणि त्या सवयी त्याला कायमस्वरूपी लागाव्यात यासाठी काय करायचं?”
मुलाला सवय लावण्यासाठी काय करायला हवं तर मुलाला सवय लावण्याकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, जो पालक त्या मुलाबरोबर सर्वात जास्त वेळ असतो किंवा मुलाला ज्या पालकाबरोबर जास्त वेळ घालवायला आवडतो, त्या पालकाने ती सवय स्वतः आत्मसात करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काय होतं की जेव्हा पालक ती सवय अंगिकारतात, तेव्हा मूल पालकांना copy करत असल्यामुळे, सगळं copy करत असताना तो तुम्हाला हवी असलेली सवयसुद्धा copy करू लागतो. पण असं न करता जर तुम्ही मुलालाच सवय लावायला गेलात तर ती सवय केवळ काही काळापुरती लागेल, कायमची लागणार नाही.
उदाहरण द्यायचं झालं तर, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने दररोज अर्धा-पाऊण तास अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही त्याच्यासमोर स्वतः अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास तुमचा मुलगा जो अभ्यास करतो तोच असला पाहिजे असं नाही, पण त्याच्यासमोर तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात, कुठल्यातरी नवीन विषयाचा किंवा गोष्टीचा अभ्यास करत आहात हे दिसलं पाहिजे. तुम्ही पाऊण तास, एक तास अभ्यास करा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमचा मुलगा तुम्हाला copy करतोय. काही दिवसांनी लक्षात येईल की आत्तापर्यंत जो मुलगा अर्धा तास पण अभ्यास करायला तयार नसायचा, तो आता पाऊण तास अभ्यास करायला लागला आहे. एवढंच नाही तर पाऊण तास झाल्यावर अजून ५ मिनिटे त्याला अभ्यास करायचा असतो.
हे कसं घडतं? तुमचं मूल तुम्ही जे काही करता त्या सगळ्याचं निरीक्षण करत असतं आणि तुम्हाला copy करायचा प्रयत्न करत असतं. तुम्हाला copy करता करता तुमच्या सवयीसुद्धा ते आत्मसात करतं. तुम्ही त्याला ‘जास्त वेळ अभ्यास कर’ हे सांगू नका, त्याऐवजी तुम्ही त्याच्यासमोर काही नवीन शिकायला सुरुवात करा. त्याचं तुमच्याकडे लक्ष आहे की नाही हे तपासू नका. कारण त्याचे डोळे कदाचित तुमच्याकडे नसतील, पण त्याचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडेच असणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्याच्या समोर असायलाच हवं असंही नाही, कदाचित तो मधेच त्याच्या खोलीत जाईल, परत तुमच्याजवळ येऊन बसेल, हरकत नाही, त्याचं लक्ष तुमच्याकडेच असतं! थोडा वेळ लागेल, त्याला १-२ महिने द्या पण तो तुम्हाला निश्चित copy करेल.
हाच उपाय आहे मुलांना दीर्घकाळासाठी सवयी लावायचा!