बॉस ‘असे’ का बरं असतात?
आपल्यापैकी जे कोणी नोकरी करतं, त्या सगळ्यांना आपल्या बॉसबद्दल काही ना काही तक्रार किंवा अडचण असतेच. एवढंच नाही, तर आपण ज्या-ज्या लोकांशी बोलतो, त्यांपैकी बरेचजण त्यांच्या बॉसबद्दल काही ना काही तक्रार करताना दिसतात. असं का बरं होतं, की नोकरी करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला आपल्या बॉसबद्दल काही ना काही त्रास का जाणवतो?
बॉस ‘असे’ का बरं असतात?
याचं उत्तर सांगण्यासाठी मला तुम्हाला एक गुपित सांगायचं आहे – आपल्या व्यावसायिक आयुष्यात आपल्याला बहुतेक वेळा अशा स्वभावाची माणसं भेटतात, ज्या स्वभावाच्या माणसांशी आपण व्यवहार करणं आपल्या वैयक्तिक आयुष्यात टाळतो. म्हणजे काय तर ज्या स्वभावाच्या माणसांना आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात टाळतो, त्यांच्याशी नातं तोडतो किंवा फार तर फक्त “काय, कसं काय चाललंय?” यापुरतं नातं ठेवतो, या स्वभावाची माणसं आपल्या व्यावसायिक आयुष्यात भेटतात.
आता विचार करा की जर निसर्गाला तुम्हाला त्या स्वभावाच्या व्यक्तींशी कसं वागायचं, त्यांच्याशी व्यवहार कसा करायचा हे शिकवायचंच असेल, तर निसर्ग अशाच स्वभावाच्या व्यक्ती तुमच्या व्यावसायिक आयुष्यात पाठवतो आणि बहुतेक वेळा ती व्यक्ती बॉसच्या भूमिकेत तुमच्या आयुष्यात येते.
अनेक लोकांनी हा अनुभवही घेतला आहे की, त्यांनी बॉसचा स्वभावाला कंटाळून एक कंपनी सोडली आणि नवीन कंपनीत नोकरी धरली, आणि नवीन बॉसमध्येही तोच गुण किंवा तोच स्वभाव त्यांना आढळला, ज्या स्वभावामुळे त्यांनी पहिली कंपनी सोडली होती. असं होतं कारण निसर्ग त्यांना सांगत असतो, “तुला या स्वभावाच्या माणसांशी कसं deal करायचं हे शिकायचं आहे, ते आता शिक. या स्वभावाच्या व्यक्तींशी योग्य प्रकारे व्यवहार करायला, योग्य रीतीने वागायला शिक. म्हणजे मग मला तुला यापुढे जे द्यायचं आहे ते देता येईल!”
बॉस ‘असे’ का असतात या प्रश्नाचं उत्तर जर आता तुम्हाला मिळालं असेल, तर या उत्तराचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसा करायला आवडेल?