कंटाळा न येता काम करण्यासाठी प्रेरणा कशी मिळवायची?

मला एक प्रश्न विचारला होता—मी जेव्हा एखाद्या खेळाडूचा खेळ बघते किंवा कोण्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत बघते तेव्हा मला काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. ही अशी बाहेरून प्रेरणा मिळवण्यापेक्षा (external motivation), कंटाळा न येता मला माझी माझीच काम करण्याची प्रेरणा (internal motivation) कशी मिळवता येईल? 

या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. समजा एक पन्नास मजली उंच इमारत आहे आणि तुम्हाला या इमारतीमधल्या दुसऱ्या मजल्यावर जिन्यावरून चढत दोन तासात जायचं आहे. तर हे करताना तुम्ही कदाचित पहिल्या मजल्यावर जाल. तिथे थोडे थांबाल मग तुम्हाला कंटाळा येईल. तश्याच कंटाळवाण्या मूडमध्ये जरा वेळाने दुसऱ्या मजल्यावर जाल. हा झाला पहिला प्रसंग. मात्र जर तुम्हाला अर्धा तासात जिन्याने चढत पन्नास मजले चढायचे असतील तर तुम्हाला कंटाळा येईल का?

आणखी एक उदाहरण बघूया. जर तुम्हाला कारने १० किलोमीटर लांब असणाऱ्या ठिकाणी एका तासात पोहोचायचं असेल तर तुम्हाला कदाचित गाडी चालवताना कंटाळा येईल. पण जर तुम्हाला एका तासात पुण्याहून मुंबईला जायचं असेल, तर तुम्हाला कंटाळा येईल का?

दोन्ही उदाहरणांमधून काय लक्षात येतं तर एखादं काम करताना गरजेपेक्षा जास्त वेळ आपल्या हातात असणं हे कंटाळा येण्यासाठीचं prerequisite आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काय काय करायचं आहे हे माहिती असेल, तर तुम्ही त्याबाबतीत seriously विचार करायला सुरुवात केली पाहिजे. याचा विचार करा की मला जे साध्य करायचं आहे, ते आत्तापर्यंत कोणाकोणाला साध्य झालं आहे? मी त्यांच्याशी बोलू शकतो का? मी त्यांच्याबद्दल आणखीन माहिती शोधू शकतो का? त्यांनी ते कसं साध्य केलं हे मी जाणून घेऊ शकतो का? तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला २४ तास अपुरे पडत आहेत.

समजा तुम्हाला हे माहितीच नसेल की तुम्हाला कविता करता येते आणि जर तुम्ही कविता करायला सुरुवात केली, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मेंदूचा creative part आता active व्हायला लागला आहे, तसंच तुमचा confidence पण वाढायला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही स्वतःला सांगितलं की आज मला ३ कविता करायच्याच आहेत तर कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही! मी कविता केली काय किंवा नाही केली काय, दोन्हीही चालणार असेल या परिस्थितीमध्ये कंटाळा येऊ शकतो.

जेवढा वेळ तुमच्याकडे आहे, त्यापेक्षा जेव्हा जास्त काम करायचं तुम्ही ठरवलेलं असतं, तेव्हा लक्षात यायला लागेल तुम्हाला की तुमच्याकडे करायला जास्त गोष्टी आहेत आणि वेळ कमी आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *