ध्यानाचा उपयोग – मनावरील नियंत्रण
आपण पाहतो की सर्व धर्मांनी ध्यानाचा म्हणजेच meditation चा पुरस्कार केला आहे. प्रत्येक धर्माचे आपले आपले काही beliefs असतात, पण ध्यानाबद्दल मात्र सगळ्यांचं एकमत झालेलं दिसतं. असं काय आहे बरं meditation मध्ये की सर्व धर्मांमध्ये त्याचं महत्त्व सांगितलं जातं?
जसं आपल्याकडून गोळा केलेला tax कुठे, किती आणि कसा वापरायचा हे दिल्लीत बसलेला एखादा माणूस ठरवतो ना तसंच आपण जी ऊर्जा घेतो किंवा recreate करतो ती ऊर्जा कुठे, कशी, आणि किती वापरायची हे आपलं मन ठरवतं. मन आपल्या आयुष्यातल्या ज्या front वर सर्वात जास्त राहतं, तिथे ऊर्जा जास्त मिळायला सुरुवात होते. मात्र, आपली ऊर्जा कुठे वापरायची याचा निर्णय घेणारं हे जे मन आहे, त्याचा चंचलता हा स्थायीभाव आहे! ज्याप्रमाणे भुंकणे हा कुत्र्याचा स्थायीभाव आहे, हंबरणे हा गायीचा स्थायीभाव आहे, त्याप्रमाणे चंचलता हा मनाचा स्थायीभाव आहे. हा स्वभाव आपल्याला काहीसा dangerous वाटू शकतो कारण आपण बसलेलो असतो लेक्चरला आणि मन घरातला विचार करत असतं. जेव्हा आपण घरात असतो तेव्हा मन कॅन्टीनमध्ये फेरफटका मारत असतं किंवा आपण कॅन्टीनमध्ये असू तर मन भूतकाळात रमलेलं असतं. म्हणजे, आपण जिथे असतो, तिथे मन नसतं. आपण जिथे असतो, मनाला तिथून वेगळीकडे जायला आवडतं. आता लक्षात येतंय का, आपल्याला मनाला एकाग्र करण्यासाठी वळण लावावं लागतं. जसं आपण आपल्या बाळाला घरी वळण लावलं तरच ते बाहेर वेड्यासारखं वागत नाही, तसंच आपण मनाला लेक्चरला बसल्यावर focus करायला सांगू शकत नाही, आपल्या मनाला आपलं ऐकायची सवय आपल्याला आधीच लावायला लागते. ध्यान केल्याने आपलं मन आपलं ऐकायला लागतं, मग ते एकाग्र होणं असूदे किंवा भरकटलेल्या मनाला एका जागी आणणं असूदे!
ज्याप्रमाणे बाळाला वळण लावायला आपण घरी सुरुवात करतो आणि म्हणून बाळ बाहेर गेल्यावर नीट वागतं, त्याचप्रमाणे आपल्या मनाने योग्य प्रसंगी आपलं ऐकावं यासाठी आपल्याला आपल्या मनाला आधीपासून train करायला लागतं. आणि हे करण्यासाठी आवश्यक आहे ध्यान करणं!
ध्यानाचे असे फायदे अनुभवण्यासाठी तुम्ही दररोजच्या आयुष्यात ध्यान करण्यासाठी थोडा वेळ द्यावा असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. हा वेळ काढल्याने तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठा बदल अनुभवाल याची मला खात्री आहे.