गणेशतत्त्व ही ती वैश्विक शक्ती आहे, जी आपल्याला विचार, चिंतन आणि कल्पना करण्यासाठी, तसंच निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेला अधिक बळ देते. त्यामुळे ज्या व्यक्तीचा कल बौद्धिक विकासाकडे असतो, अशा व्यक्तीने गणेशतत्त्वाची आराधना करावी.
ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला ऑटो एक्स्पो असतात, जॉब फेअर्स असतात किंवा प्रॉपर्टी एक्स्पो असतात, पण सगळीकडे सगळेच जण जात नाहीत. ज्या व्यक्तीला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या क्रांतीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असते, ती व्यक्ती ऑटो एक्स्पोला जाते. नोकरीच्या शोधात असलेली किंवा नोकरी बदलू इच्छिणारी व्यक्ती जॉब फेअरमध्ये जाते. स्वतःच्या वापरासाठी किंवा गुंतवणुकीसाठी प्रॉपर्टी शोधणाऱ्या व्यक्तीला प्रॉपर्टी एक्स्पोला जायला आवडतं.
अगदी त्याचप्रमाणे, ज्यांना आपल्या बुद्धीचं पोषण करायचं आहे, बौद्धिक क्षमता समृद्ध करायची आहे, त्यांनी ध्यान, जप किंवा उपवासाच्या माध्यमातून वातावरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या गणेशतत्त्वाशी नातं निर्माण करावं.
आत्ता आपण गणेशोत्सव साजरा करत आहोत.
गणेशतत्त्व मानवी मेंदूमधील बौद्धिक क्षमतेला मदत करतं, तिचं पोषण करतं आणि तिला समृद्ध करतं. त्यामुळे हे दहा दिवस विद्यार्थी, शास्त्रज्ञ, डॉक्टर, कलाकार, वकील, प्राध्यापक किंवा ज्यांच्या कार्यामध्ये अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बौद्धिक क्षमतेची आवश्यकता असते, अशा व्यक्तींसाठी एक सुवर्णसंधी आहे. याचं कारण असं की, वर्षाच्या उर्वरित काळाच्या तुलनेत या काळात हे तत्त्व आपल्यासाठी हजारपट अधिक उपलब्ध असतं.
गणेशतत्त्वाशी नातं निर्माण करण्यासाठी अगदी साधं ध्यानही पुरेसं आहे. घरातील गणेशमूर्तीसमोर किंवा आपल्या जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दहा मिनिटं बसावं आणि आपली संपूर्ण मानसिक ऊर्जा त्या गणेशमूर्तीच्या चरणकमलांवर केंद्रित करावी. यामुळे गणेशतत्त्वाशी जोडले जाण्यास मदत होते.
ज्याप्रमाणे ब्लूटूथच्या माध्यमातून एक मोबाइल दुसऱ्या मोबाइलशी जोडला जातो, त्याचप्रमाणे आपणही या तत्त्वाशी जोडले जाऊ शकतो.
एका वेळी एकाच गोष्टीवर मन एकाग्र करणं आणि गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये दररोज एका ठराविक वेळी हे ध्यान सातत्याने करणं, ही यामागची गुरुकिल्ली आहे.
थोडक्यात सांगायचं तर, गणेशतत्त्व वर्षातील इतर दिवसांच्या तुलनेत आता जास्त प्रमाणात उपलब्ध असणार आहे. जर तुमचा कल बौद्धिक विकासाकडे असेल, तर गणेशोत्सव तुमच्यासाठी एक नामी संधी आहे!