हनुमानांच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट…
हनुमान हे असे एक दैवत आहे ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. त्यांच्याकडून आपण जितके शिकू तितके कमीच आहे. मी जी एक गोष्ट तिथून शिकलो ती मी कायम लक्षात ठेवतो – माणसाच्या ठायी भावुकता (being emotional) आणि व्यवहार-चातुर्य (being practical) या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू
शकतात. या दोन्ही गोष्टींमध्ये either – or अशी निवड करण्याची गरज नसते. यासाठी रामायणातली एक गोष्ट सांगतो. अयोध्येला परत आल्यावर सीतामाई रोज आपल्या कपाळावर कुंकू लावतात हे हनुमानांनी पाहिले होते. त्यांनी सीतामाईंना विचारले, आपण रोज कपाळावर हे काय लावता? पतिव्रता सीतामाईंनी सांगितले;माझ्या पतींचे, श्रीरामांचे आयुष्य वाढावे यासाठी मी रोज माझ्या कपाळावर कुंकू (सिंदूर) लावते. हे ऐकताच हनुमानांच्या मनातील भक्तिभाव जागृत झाला. त्यांच्या मनात विचार आला की सीतामाईंनी त्यांच्या कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे जर श्रीरामांचे आयुष्य वाढत असेल तर मी माझ्या संपूर्ण शरीरावर ते का लावू नये? त्यामुळेच अनेक ठिकाणी हनुमानांच्या मूर्तीवर शेंदूर (सिंदूर) लावलेला आपण पाहतो. हा आहे त्यांच्या भावूक, भक्तिमय स्वभावाचा भाग.
आता हेच हनुमान जेव्हा रामाचे दूत म्हणून रावणाच्या लंकेत गेले तेव्हा काय घडले? सीतामाईंना भेटून, त्यांना श्रीरामांचा निरोप देऊन जेव्हा ते लंकेतून निघाले तेव्हा त्यांनी वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली. सीतामाईंना भेटून ते तसेच परत येऊ शकले असते. मग लंका जाळण्यामागे काय बरं कारण असावे? त्यामागे त्यांचा विचार असा होता की रामाचा एक दूत लंका जाळतो आणि रावण आपल्याला त्यापासून वाचवू शकत नसेल तर मग स्वतः श्रीराम लंकेत आल्यावर काय घडू शकते? असा प्रश्न तिथे निर्माण करावा. या नुसत्या विचारानेच रावणाच्या सैनिकांचे, राक्षसांचे मनोबल ढासळविण्याचा हा त्यांचा डाव होता. या प्रसंगातून हनुमानांचे रणनीतीमधील कौशल्य आणि व्यवहार-चातुर्य आपल्या लक्षात येते. हनुमानांचे व्यवहार-चातुर्य आणि भावुकता हेच सांगतात की या दोन्ही गोष्टी माणसाच्या ठायी एकत्र असूच शकतात. हनुमानांच्या जगण्यातून मिळणारी ही शिकवण आजही तितकीच उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. आपणही ही शिकवण आपल्या अंगी बाणवू शकतो.