स्वतः मधील कौशल्यावर लक्ष केंद्रित करा
आत्तापर्यंत आपण नेहमीच असे ऐकत आलो आहोत की, आपल्यात जी काही उणीव आहे, कमतरता आहे ती ओळखून ती भरुन काढली तर मग आपण तिचा वापर आपली ताकद म्हणून करु शकतो. आज मात्र मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेतून बघणार आहे. ते तुम्हाला पटतंय का ते सांगा.
एक उदाहरण देतो. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा अ आणि ब या तुकड्या विशेष असायच्या. जी मुले अभ्यासातही हुशार असायची आणि खेळातही प्राविण्य दाखवून शाळेला ट्रॉफी मिळवून द्यायची ती सर्व मुले या दोन वर्गांमध्ये असायची. त्यावेळी शाळेत सर्व मुलांसाठी वर्गात किमान ७५% उपस्थिती अनिवार्य असे. परंतु या दोन वर्गांमधील मुलांसाठी हा नियम आपसूकच शिथील होत असे. याउलट इतर सर्व म्हणजे क, ड, ई, फ, ग या तुकड्यांमधील मुलांसाठी हाच नियम काटेकोरपणे लागू केला जाई. मी हे उदाहरण इथे का बरं देतोय? वर मी म्हटलो तसे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायचे म्हणजे नेमके काय, तो नवीन विचार कसा करता येईल यासाठीच हे उदाहरण दिले आहे. जर तुम्हाला हवे तर तुमच्यातील उणिवांवर काम करुन त्यांना तुम्ही स्वतःची ताकद म्हणून वापरु शकताच पण वेगळा विचार केला तर तुमच्यामध्ये जन्मजात जे कौशल्य आहे त्यालाच इतके पैलू पाडू शकता की पाहणाऱ्यांना तुमच्यातील उणिवा जाणवणारही नाहीत. जेव्हा तुमच्या आतील कसब हे शंभर नंबरी सोन्यासारखे लखलखत असते तेव्हा तुमच्यातील उणिवांकडे आपोआपच कानाडोळा केला जातो.
हे कसं घडतं? आपल्या सर्वांच्याच परिचयाची ३ उदाहरणे पाहू.
१) Bollywood मध्ये अभिनयासाठी, हर तऱ्हेच्या भूमिका करणारा कलाकार म्हणून ओळखला जाणारा आमीर खान. तो बारावी पास आहे. पण त्याने त्याच्यातील अभिनयगुणावर भर देऊन आघाडीचा अभिनेता म्हणून नाव कमावलं.
२) भारतासाठी पहिला विश्व-चषक जिंकणारा कपिल देव याने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. पण स्वतःमधील क्रिकेट कौशल्यावर लक्ष केंद्रित करुन एक उत्कृष्ट क्रिकेट कॅप्टन महणून नावलौकिक मिळवला.
३) गौतम अदानी हे एक नावाजलेले व्यावसायिक आहेत. गुजरात विद्यापीठात B.Com करत असताना दुसऱ्या वर्षीच ते तिथून बाहेर पडले. परंतु स्वतःमधील व्यवसायाला पूरक अशा गुणांच्या आधारे आज त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील शिखर गाठले आहे.
या तिघांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे ती म्हणजे स्वतःमधील जन्मजात गुण जाणून, त्यावर लक्ष देऊन आपापल्या क्षेत्रात अव्वल क्रमांकाने चमकणं. ही जी त्यांची चमक आहे त्यापुढे त्यांचे शिक्षण किती झाले आहे हा विचारही कधी कोणाच्या मनाला शिवत नाही.
यावरुन धडा घेऊन जर आपण सर्वांनी आपल्यामधील उणिवांवर काम करण्यापूर्वी आपल्यातील जन्मजात कौशल्य जाणून घेऊन त्यावरच आपले सर्व लक्ष केंद्रित केले आणि त्याच कौशल्याला झळाळी दिली तर पाहणाऱ्याचे डोळे त्यानेच दीपून जातील. पाहणाऱ्याच्या लेखी तुमच्यामधील उणिवांचा लवलेशही उरणार नाही. आणि हाच एक यशाचा मंत्र होईल. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वकील, डॉक्टर, कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक अथवा आयटी क्षेत्रामधील कर्मचारी असो, प्रत्येकालाच या मंत्राचा फायदाच होईल.