स्पष्टता
कोणत्याही गोष्टीविषयी आपल्या मनात संपूर्ण स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या मनात कोणत्याही गोष्टीची सुस्पष्टता असली की आपले मन लगेच त्या कामाला लागते. परंतु एखाद्या गोष्टीबद्दल जर आपली द्विधा मनःस्थिती असेल तर मन तिथेच अडकून पडते, ते काम करत नाही.
एक उदाहरण पाहू. आपल्या आसपास आपण असे पाहतो की काही लोक नेहमी असे म्हणतात की त्यांना पैसा, संपत्ती ह्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. आणि मग कधीतरी हेच लोक अशी तक्रारही करतात की त्यांच्या कोणा ग्राहकाकडून त्यांना पैसे येणे आहे पण ते मिळत नाही आहेत. किंवा त्यांच्या मुलाच्या कंपनीत सर्वांचे १८% appraisal झाले परंतु त्यांच्या मुलाचे मात्र ३% च appraisal झाले आहे. सर्वजण सारखेच काम करत आहेत, उलट त्यांचा मुलगा तर कधी कधी overtime सुद्धा करतो, जास्त वेळ office मध्ये थांबतो. तरीही १८% आणि ३% असा फरक का? कारण ह्या लोकांच्या मनात पैशाबद्दल स्पष्टता नसते. एका बाजूला ते म्हणतात की पैशाने त्यांना काही फरक पडत नाही आणि दुसरीकडे लगेच पैसे मिळत नाहीत म्हणून तक्रारही करतात. त्यामुळे त्यांच्या मनाला स्पष्ट सूचना मिळत नाही आणि मग ते काम करायचे की नाही याबद्दल मन गोंधळून जाते.
नातेसंबंधांबद्दल असेच एक उदाहरण बघू. आपल्याला एखाद्या व्यक्ती बरोबरचे नाते छान फुलवत पुढे न्यायचे असते. परंतु त्या व्यक्तीचे दुसऱ्या कोणाबरोबरचे चांगले वागणे पाहून आपल्या मनात लगेच त्या नात्याबद्दल शंका डोकवू लागतात. त्यानंतर त्या शंका बाजूला सारून आपण पुन्हा आनंददायी नात्याची इच्छा करतो. एका पाठोपाठ एक अशा गोंधळात टाकणाऱ्या सूचना मनाला मिळाल्या की मन गोंधळातच राहते. ते या नात्याबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाही.
यावर जरुर विचार करा. द्विधा मनःस्थितीमुळे मनाला, मनाच्या कल्पनाशक्तीला काम करायला पुरेसा वावच मिळत नाही. आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीविषयी आपल्या मनात संपूर्ण स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे!