अनेकवेळा आपल्याला असं जाणवतं की काही माणसांना आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. आणि विचार केला तर असंही लक्षात येतं की आपल्याला छान वाटेल असं त्यांनी मुद्दाम काहीही केलेलं नसतं, आणि तरीही आपल्याला छान वाटतं. ही किमया असते ही माणसं ज्या प्रकारचा विचार करतात त्या विचारांच्या स्पंदनांची! चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास त्यांच्या विचारांत उतरतो. लोकांमध्ये चांगले गुण असतात हे ते जाणतात. या संपूर्ण जगात जे जे चांगले आहे ते पारखून मला ते माझ्या अंगी बाणवायचे आहे याची त्यांना जाणीव असते. अशाच विविध गोष्टींमुळे त्यांच्या विचारांवर चांगुलपणाचा पगडा असतो आणि म्हणूनच त्यांच्याकडून आपल्यापर्यंत येणारी स्पंदने ही आपल्यालाही चांगल्या वातावरणाचा अनुभव देतात.
अशीही अनेक माणसं असतात ज्यांच्या अंगातील दुर्गुणच चटकन दिसून येतात. ते पाहिल्यावर नक्कीच त्या माणसांपासून सगळे लांब जातात. इथेही हेच लक्षात येते की त्या माणसांनीही आपल्याला वाईट वाटेल, आपण दुःखी होऊ असे त्यावेळी काहीच केलेले नसते तरी पण आपल्याला त्यांच्याशी आपणहून बोलावेसे वाटत नाही.
याचे कारण एकच – The vibrations you transmit is the fragrance you spread!