लग्नाचा मूळ हेतू काय आहे?

सामान्य माणसाच्या आयुष्यात ‘लग्न’ या संस्काराचं उद्दिष्ट्य काय आहे? ही लग्नसंस्था जेव्हा तयार झाली तेव्हा ती करण्यामागे कोणता हेतू असावा? आज मी लग्नाविषयीच्या या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे.

जेव्हा लग्नसंस्था अस्तित्वात आली तेव्हा लग्न करण्यामागचा हेतू हा ‘स्वतःसाठी अनुरूप जोडीदार शोधून त्याच्याबरोबर सुखी, समाधानी आयुष्य जगणे’ किंवा ‘मी अमुक एक काम करू इच्छितो आणि ते काम आयुष्यभर सुरळीत करता यावं यासाठी मला मदत करायला कोणीतरी जोडीदार माझ्या आयुष्यात यावा’ असा नव्हताच मुळी! विश्वाचा हा जो प्रपंच मांडलेला आहे त्यामध्ये ‘नवीन पिढी जन्माला घालणे आणि त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सक्षम बनवणे’ हा लग्नाचा मूळ हेतू आहे. विश्वाच्या प्रपंचाची व्यवस्था नीट लागावी यासाठी लग्न आणि त्यातून निर्माण होणारी कुटुंब व्यवस्था अतिशय उपयोगी ठरतात. जसजसा प्रपंचाचा विस्तार होऊ लागतो त्याप्रमाणात सुयोग्य व्यवस्थापनाची गरज ही निर्माण होते. ही गरज पूर्ण करून प्रपंच सुरळीत चालावा यासाठी लग्न हे एखाद्या व्यवस्थापन प्रणालीची भूमिका बजावत असते. लग्नानंतर ज्या नवीन पिढीला जन्म देऊन सक्षम बनवले जाते ती पिढी पुढे लग्न करुन पुढील नवीन पिढीला जन्म देते. त्या पिढीला योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांच्या आयुष्यासाठी तयार करते. अशाप्रकारे प्रपंचाचे हे चक्र अव्याहतपणे चालू ठेवणे हाच लग्नाचा मूळ हेतू होय.

मग लग्नविषयाशी संबंधीत असा प्रश्न येऊ शकतो की लग्न झाल्यावर त्यातील नातेसंबंधात अडचणी निर्माण होतात त्यावर काय उपाय आहे ? हा प्रश्न उपस्थित होणे हे ही साहजिकच आहे. त्यासाठी नातेसंबंधांचा अभ्यास करुन समाधानकारक तोडगेही नक्कीच काढता येतात. यासाठीच नातेसंबंध सुदृढ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या sessions आणि YouTube वरच्या videos मधून हा विषय पुन्हा पुन्हा हाताळत असतो. मात्र या गोष्टींचा साधक बाधक विचार करूनही लग्नामागचे मूळ उद्दिष्ट हे नवीन पिढीचे निर्माण आणि योग्य संगोपन हेच आहे हे लक्षात ठेवायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *