मुलांच्या संगोपनाचे ध्येय काय असावे?

फक्त मुलांच्या पालकांसाठीच नाही तर शाळेत मुलांचं संगोपन करणाऱ्या शिक्षकांसाठीसुद्धा ‘पालकत्व’ (parenting) हा एक महत्वाचा विषय आहे.  मुलांचे पालन-पोषण करताना आपण एक प्रश्न कायम स्वतःला विचारायला हवा. तो म्हणजे – ‘मी माझ्या मुलांसाठी ज्या गोष्टी विकत घेतो आहे किंवा त्यांना जे अनुभव मिळावेत यासाठी प्रयत्न करतोय, त्या वस्तू आणि अनुभव माझ्या मुलांसाठी खरोखर योग्य आहेत की लहानपणी मला या गोष्टी आणि अनुभव मिळाले नाहीत म्हणून मी माझ्या मुलांसाठी या वस्तू विकत घेतोय किंवा त्यांना हे अनुभव मिळावेत म्हणून प्रयत्न करतोय?’

जर मुलांचे संगोपन करतानाचा आपला driving force ‘माझ्या लहानपणी मला जे जे नाही मिळालं, ते ते सगळं माझ्या मुलांना मिळायला हवं’ या brokenness मधून येत असेल, तर ही परिस्थिती चिंताजनक आहे! कारण काय होतं, पालक जेव्हा आपल्या मुलांना त्यांना लहानपणी न मिळालेल्या गोष्टी किंवा अनुभव सहजपणे उपलब्ध करुन देतात, तेव्हा त्या गोष्टींबरोबरच मुलांना नकळतपणे एक सवयसुद्धा लावतात – ‘आपण मागितले की ते मिळतेच’! मग काय होतं की मुलं मोठी होऊन शाळा-कॉलेजमध्ये जायला लागतात आणि तिकडे मात्र त्यांनी काहीही मागितलं तरीही ते लगेच मिळतं असं होत नाही. शाळा-कॉलेजचं जग, तिथलं वातावरण हे घरच्या वातावरणापेक्षा खूप वेगळं असतं. आणि ‘मला हवं ते मिळत नाही’ असं होण्याची सवय नसल्यामुळे मग या नवीन वातावरणामध्ये आपल्या मनाला सांभाळणं मुलांना कठीण होऊन बसतं. मग मुलं stress घेऊ शकतात, tension घेऊ शकतात किंवा दुःख झेलण्याची सवय नसेल तर त्यांना मानसिक किंवा भावनिक त्रासाला सामोरं जायला लागू शकतं.

आपल्या मुलांच्या बाबतीत असं होऊ नये म्हणूनच पालक म्हणून जबाबदारी घेताना सर्वात महत्वाची पायरी कोणती तर ती म्हणजे मुलांचं संगोपन करतानाचा हेतू हा ‘आपल्या बालपणातील कसर भरून काढणे’ नसून आपल्या मुलांचे सर्वतोपरी हित लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढे पावले टाकणे हा असावा. पालक म्हणून केलेली आपली प्रत्येक कृती ही आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून, त्यांच्या भविष्यासाठी supportive असायला हवी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *