मुलांचे कौतुक कसे करायचे?

आपल्या घरी कुणी पाहुणे आले की त्यांच्यासमोर आपण आपल्या मुलाचं एखाद्या गोष्टीसाठी मनापासून कौतुक करतो. त्यांना सांगतो की माझा मुलगा खूप छान उड्या मारतो. तो एका मिनिटांत २० उड्या अगदी सहज मारू शकतो. आपण मुलाला खरंच उडी मारून दाखवायला सांगतो. मुलगाही आनंदाने तयार होतो आणि उड्या मारून दाखवतो. मुलं इतक्या सहज असं काही करून दाखवायला तयार होतात कारण त्यांना हे पक्कं ठाऊक असतं की उड्या मारून दाखवल्यावर त्यांचं आणखी कौतुक होणार आहे.

आपल्या एखाद्या गोष्टीचं कौतुक होत आहे हे लक्षात आल्यावर मुलं ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायला आनंदाने तयार असतात. मग आपल्या मुलाचं नेमकं कशासाठी कौतुक करायचं याचा विचार डोळसपणे करायलाच हवा!

आपलं मूल परीक्षेत पहिलं आलं किंवा पळण्याच्या शर्यतीत त्याला पहिला क्रमांक मिळाला तर त्यासाठी त्याने जे कष्ट घेतले, त्या कष्टांचं कौतुक करा. त्याच्या प्रयत्नांना दाद द्या. त्याला मिळालेला पहिला क्रमांक हा कौतुकाचा विषय नसावा तर त्या क्रमांकापर्यंत पोहोचताना त्याने जे सातत्याने प्रयत्न केले त्याचा विशेष उल्लेख करुन कौतुक करायला हवं.

उदाहरणार्थ, मुलगा जेव्हा त्याला खेळात मिळालेलं पारितोषिक दाखवतो तेव्हा ते पहाताना, तो रोज २ तास करत असलेला सराव आणि घरी आल्यावर अभ्यास-खेळ यांचा वेळेनुसार घातलेला योग्य मेळ या गोष्टींचा विशेष उल्लेख करुन, त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करुन, त्या प्रयत्नांसाठी आपल्याकडून एखादं बक्षीस जरुर द्यावं. किंवा आपली मुलगी सजगतेने अभ्यास करते. परीक्षेच्या तयारीसाठी सर्वांबरोबर नात्यातील लग्नसमारंभाला न जाता घरी थांबून अभ्यास करते आणि परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होते तेव्हा तिने अभ्यासासाठी घेतलेले कष्ट, प्रसंगी बाजूला सारलेली मजा या तिच्या प्रयत्नांचे जरुर कौतुक करा.

परीक्षेत पहिला क्रमांक आला तर मी तुला बक्षीस देईन असं सांगितलं तर काही दिवसांनी मुलांना अशी भीती वाटू शकते की माझा पहिला क्रमांक आला नाही तर मला आई-बाबा बक्षीस देणार नाहीत का? त्यांचे माझ्यावरचे प्रेम कमी होईल का? अशी भीती मुलांना वाटायला नको. यासाठीच अव्वल क्रमांक नाही तर तिथे जाण्यापर्यंतचे प्रयत्नच महत्त्वाचे आहेत हे मुलांच्या मनावर ठसू द्या. त्यामुळे त्यांचं लक्ष हे प्रथम क्रमांकावर न राहता प्रयत्नांवर एकाग्र होईल. प्रयत्नांच्या पाठोपाठ प्रथम क्रमांक आपसूकच येतो हे त्यांच्या लक्षात येईल. आणि त्याबरोबरच त्यांना हे कळेल की काही कारणाने मला पहिला क्रमांक नाही मिळाला तरीही माझ्या पालकांचं माझ्यावरचं प्रेम तसूभरही कमी होणार नाही!     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *