मुलांची निर्णयक्षमता कशी वाढवायची?

मुलांची निर्णयक्षमता वाढावी म्हणून आपण पालक म्हणून काय करू शकतो तर आपण जेव्हा मुलांशी संवाद साधतो, तेव्हा मुलांना एखाद्या गोष्टीबद्दलचं आपलं मत न सांगता, facts म्हणजे वास्तव काय आहे ते सांगायचं.

मुलांशी गप्पा मारताना आपण त्यांना अनेक गोष्टी सांगतो. उदाहरणार्थ, आपण असं सांगतो की वांग्याचं भरीत खाल्लं की पित्ताचा त्रास होतो, म्हणून तू भरीत खाऊ नकोस. किंवा आपण असं सांगतो की इजिप्त हाच जगातील सुंदर देश आहे. किंवा कधी आपण असं सांगतो की कोणीतरी एक अभिनेता अगदीच वाईट अभिनय करतो. मला तो बिलकुल आवडत नाही. तूही त्याचे चित्रपट पाहू नकोस. ही तीनही उदाहरणं नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की आपण मुलाला सांगितलेल्या या तीनही गोष्टी म्हणजे आपली तीन मतं आहेत. ते वास्तव नाही. मुलांशी बोलताना आपण आपली मतं सांगतोय, facts सांगत नाहीये.

मुलं मोठी होईपर्यंत जर असंच सुरु राहिलं तर कोणताही निर्णय घेताना, अगदी त्यांच्या लग्नाच्यावेळी स्वतःचा जोडीदार निवडतानाही, मुलं गोंधळून जातील. मुलं जेव्हा वर्षानुवर्षं facts ऐकून, त्यावर विचार करून, स्वतःचा स्वतः निर्णय घेण्याचा सराव करतात, तेव्हाच त्यांचा निर्णय घेण्याचा muscle हा तयार होऊ शकतो आणि त्यांची निर्णयक्षमता ही उत्तम होऊ शकते. हा सराव झालेला नसेल तर महत्वाच्या क्षणी ते स्वतःचा स्वतः निर्णय घेऊ शकणार नाहीत.

मुलांशी संवाद साधताना त्यांना त्यांची मतं तयार करायची मुभा द्यायला हवी. म्हणजे वांग्याचे भरीत खाल्ल्यावर मला पित्ताचा त्रास होतो. तू भरीत खाऊन बघ आणि मग सांग तुला कसं वाटतं? किंवा मला एखादा अभिनेता आवडत नाही कारण तो romantic चित्रपटात कामं करतो आणि मला action असलेले चित्रपट अधिक आवडतात. तुला कोणता अभिनेता आवडतो? ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यं असणारा देश म्हणून मला इजिप्त आवडतो. तुला कोणता देश बघायला आवडेल? सांस्कृतिक मूल्यं असणारा, architectural मूल्यं असणारा किंवा एखादा फ्रान्ससारखा romantic मूल्यं असणारा असं सांगितल्यामुळे मूल आपला आपला विचार करुन मग हळूहळू स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकतं. निर्णय घेण्याची त्याची क्षमता आता वाढीला लागू शकते.

आपण मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच जर स्वतःचा स्वतः विचार करुन निर्णय घ्यायला आपण प्रवृत्त केलं तर पुढे जाऊन ते प्रत्येक गोष्टीत सारासार विचार करुन योग्य निर्णय घेऊ शकतील, मग तो निर्णय त्यांच्या जोडीदार ठरवण्याचा असो अथवा आणखी कुठला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *