माझ्या आयुष्यात बदल कसे करू?

आपल्या आयुष्यात केलेले छोटे छोटे बदल आयुष्यात खूप मोठं परिवर्तन करू शकतात! असं मोठं परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणते छोटे बदल कारणीभूत ठरू शकतात याची काही उदाहरणं आज आपण बघूया.

पहिलं उदाहरण- समजा आपण विद्यार्थी आहोत आणि सलग एका जागी बसून आपला अभ्यास होत नाहीये. पण अभ्यास करण्यासाठी सलग एका जागी बसायला तर हवं आहे! मग आता तसं व्हावं यासाठी आपण कोणता बदल करू शकतो? तर यासाठी आपण ‘पुढचा १ तास काहीही झाले तरी मी जागेवरून उठणार नाही’ असं ठरवू शकतो आणि मग उठायची इच्छा झाली तरी बसल्या जागीच २ मिनिटांचा ब्रेक घेऊ शकतो. ‘मी बसल्या जागेवरून १ तास  उठणार नाही’ हा झाला छोटा बदल आणि हे केल्याचा परिणाम असेल ‘सलग एका जागी बसून अभ्यास करता येणं’ हा मोठा बदल!

दुसरं उदाहरण- समजा तुम्ही खूप रागीष्ट आहात. तुम्हाला नेहमी राग येतो आणि मग त्यामुळे तुमचं नुकसानही होतं. हे वारंवार होऊनही राग काही कमी होत नाही. मग राग कमी करण्यासाठी कोणता छोटा बदल करता येईल? तर, घरातून निघताना ‘आज मी प्रत्येकाशी प्रेमानेच बोलेन’ असं ठरवून निघायचं. आणि संध्याकाळी घरी आल्यावरच या छोट्या बदलाचा तुमच्या रागावर झालेला परिणाम तपासायचा. या छोट्या बदलाचा परिणाम तुमच्या रागाच्या पाळतीवर कसा होतो हे नक्की करून बघा!

तिसरं उदाहरण- आपल्याला आपलं  income वाढवायचं आहे, आपला bank balance वाढवायचा आहे. तर हे होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी योग्य investments कराव्या लागतील, जेणे करुन आपले income वाढेल हे तर नक्कीच! मात्र त्याच्याही आधी, सुरुवात म्हणून आपण कोणते छोटे बदल करू शकतो? समजा तुमचे सगळे ड्रिंक्स घेणारे मित्र एकत्र ड्रिंक्स घ्यायला जमणार आहेत आणि त्यांनी तुम्हाला जबरदस्तीने तिकडे नेलं आहे. आता तुम्ही तर ड्रिंक्स घेत नाही, पण केवळ तुम्ही मित्रांबरोबर गेल्यामुळे तुम्हाला बिल भरताना तुमचा share भरावा लागतो. अशावेळी मी ड्रिंक्स घेतले नाहीत म्हणून मी माझा share भरणार नाही हे सांगायला तुम्ही कचरता व त्यामुळे बरेच रुपये त्या बिलावर खर्च करुन येता. तिथून घरी आल्यावर पुढचा संपूर्ण आठवडा स्वतःला त्या अनावश्यक खर्चासाठी दोषी मानत राहता. मात्र स्वतःला दोष देण्यापेक्षा, असे विनाकारण करावे लागणारे खर्च टाळणे हा छोटा बदल आपण आपल्यात करू शकतो! या छोट्या बदलाचा सरतेशेवटी परिणाम असा होईल की आपलं income वाढायला सुरुवात होईल!

तुम्हाला कोणते मोठे बदल तुमच्या आयुष्यात घडावेत असं वाटतंय? आणि तो बदल घडवण्यासाठी वरील उदाहरणांच्या मदतीने तुम्ही कोणते छोटे बदल तुमच्या आयुष्यात आजपासून करायला लागणार आहात?

1 Comment

  • एकदम बरोबर आहे, गुरुश्री !
    मोठी गोष्ट साधण्यासाठी छोट्या गोष्टीने सुरुवात करावी लागते आणि ती छोटी गोष्ट हळू हळू मोठा बदल घडवून आणते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *