भीती नष्ट कशी करायची?

आपल्या मनात उत्पन्न होणारी भीतीची भावना आपल्याला काय सांगते? तर भीती उत्पन्न झाली याचाच अर्थ काहीतरी वेगळं घडत आहे आणि आपण तिकडे लक्ष द्यायची गरज आहे.

अश्मयुगात माणूस जेव्हा टोळ्यांमध्ये रहायचा, तेव्हा स्वतःच्या टोळीचे, टोळीसाठी जमवलेल्या अन्नाचे दुसऱ्या टोळ्यांपासून संरक्षण करणे हा त्याच्या जीवनाचा नित्य भाग होता. अशावेळी, एखाद्या रात्री जर टोळीसाठी पहारा देणाऱ्या माणसाला कोणा इतर माणसाची अवेळी चाहूल लागली तर सर्वप्रथम त्याच्या मनात भीती निर्माण होत असे. स्वसंरक्षण, स्वबांधवांचे रक्षण आणि टोळीच्या मालकीच्या अन्नाचे रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने मनात निर्माण झालेली भीती त्याला ताबडतोब कृती करायला भाग पाडत असे. टोळीतील झोपी गेलेल्या इतर माणसांना उठवणे, हत्यारे घेऊन सज्ज होणे आणि शत्रू-टोळीला प्रत्युत्तर देणे यासाठी तो तयार होत असे. भीतीचा परिणाम म्हणून कृती केल्यावर आता भीती नाहीशी होणार. भीतीवरचे लक्ष संरक्षणावर केंद्रित झाल्याने भीतीचे काम संपले. जसं एखादी गाडी सुरु करणे हे ignition चे काम आहे, तसेच कृती घडवून आणणे हे भीती या भावनेचे काम आहे. भीती signal आहे, त्यामुळे भीती वाईट नाहीये, मात्र प्रमाणापेक्षा अधिक भीती ही वाईट आहे. फक्त भीतीच नाही, तर कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक असणे हे वाईटच असतं.

समजा आपली परीक्षा अगदी जवळ आली आहे आणि आपल्याला परीक्षेची भीती वाटत आहे. अशावेळी लक्ष देऊन syllabus पूर्ण केला, revision केली तर अभ्यासाचा परिणाम म्हणून परीक्षेची भीती न उरता आपण परीक्षेसाठी हसत खेळत तयार होऊ. इथेही अभ्यासावर सर्व लक्ष केंद्रित केले तर भीती संपते. जर निम्मे लक्ष अभ्यासावर आणि निम्मे लक्ष मनातल्या भीतीवर असेल तर मात्र परीक्षेचा निकाल चांगला लागणार नाही. एखाद्या चौकातील वाहतुकीचे सिग्नल आपल्याला काय सांगतात? लाल दिवा लागला की थांबायचे आणि हिरवा दिवा लागला की चौक पार करायचा. या दिव्यांमुळे वाहने एकमेकांवर धडकून होणाऱ्या त्या चौकातील अपघातांची शक्यता कमी होते. मग या सिग्नल विषयी आपण तक्रार करतो का? नाही ना? तसेच भीती हा देखील आपल्यासाठी एक सिग्नल आहे, आपण ज्याची भीती वाटते आहे, त्या गोष्टीची दखल घेऊन त्यावर काम करण्यासाठी. आपण भीती या भावनेचे कारण समजून घेऊन, त्यानुसार कृती केल्याने, भीती आपोआपच नष्ट होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *