प्रार्थना करताना कोणती काळजी घ्यावी?

आपण प्रार्थना कशी करतो? साधारण १० मिनिटे आपण प्रार्थना करतो. मग आपण आपलं काम करायला लागतो आणि आपण केलेल्या प्रार्थनेला विसरून जातो. खरंतर, प्रार्थना म्हणजे १० मिनिटात उरकण्याचं काम नाही तर २४ तास करायची कृती आहे! हे अजून स्पष्ट व्हावं यासाठी माझा एक अनुभव सांगतो.

मी एका लग्नघरी गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे. त्यावेळी नवऱ्या मुलीच्या हातावर मेंदी काढत होते. मेंदी काढून द्यायला आलेल्या मुलीने अगदी १५/२० मिनिटांतच अतिशय रेखीव, सुंदर मेंदी नवऱ्या मुलीच्या दोन्ही हातांवर काढून दिली होती. निघताना मेंदी जिने काढून दिली, तिने सांगितले की ‘आता ही मेंदी जर चांगली रंगायला हवी असेल तर पुढचे २४ तास त्या मेंदीची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला हवी.’ म्हणजेच नवऱ्या मुलीला पुढचे २४ तास हातावर मेंदी काढली आहे याचं भान राखून वावरावं लागणार होतं. मग हाताने काही काम करायचं नाही, हात कुठे आजूबाजूला लागणार नाही याची काळजी घ्यायची, हे सगळं आलं. आणि हे केलं तरच ती मेंदी छान रंगणार होती. आपण करतो त्या प्रार्थनेचेही काहीसे असेच आहे. प्रार्थना करायला अवघी १० मिनिटे लागतात. पण ती फलद्रूप होण्यासाठी मात्र पुढचा सर्व काळ आपण प्रार्थना केली आहे याचे भान ठेवले पाहिजे.

समजा आपण आपली स्मरणशक्ती चांगली व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे आणि पुढच्याच मिनिटाला कोणाशी तरी बोलत असताना ‘मला ना काही आठवतच नाही’, ‘काहीच लक्षात राहत नाही’, ‘पटकन सगळं विसरायलाच होतं’ असं जर आपण म्हणायला लागलो तर ही सर्व वाक्यं आणि आपण करत असलेला त्याच प्रकारचा प्रत्येक विचारसुद्धा प्रार्थना म्हणूनच स्वीकारला जातो. आपणच आपल्या प्रार्थनेच्या विरुद्ध बोललो तर प्रार्थना सफल कशी होणार?

अजून एक उदाहरण पाहू. समजा एखाद्या व्यक्तीचं आणि आपलं नातं छान व्हावं म्हणून आपण प्रार्थना केली आहे. आणि लगेचच कोणाबरोबर तरी बोलताना त्याच व्यक्तीविषयी उलट सुलट गप्पा मारायला सुरुवात केली. तर काय होईल? ते नातं चांगलं होणार नाही कारण आपणच आपल्या प्रार्थनेच्या विरुद्ध वागतो आहोत.  

लक्षात घ्या, प्रार्थना ही १० मिनिटे केली आणि आपलं काम संपलं या प्रकारची कृती नाहीये. प्रार्थना केल्यावर उरलेला संपूर्ण वेळ आपण केलेल्या प्रार्थनेचं भान ठेवून आपल्याला वागायचं आहे. प्रत्येक कृती करताना, प्रत्येक शब्द उच्चारताना, आपण केलेल्या प्रार्थनेचा विचार आपल्याला मनात सुरु असायला हवा. आणि म्हणूनच प्रार्थना ही फक्त १० मिनिटे करायची कृती नसून २४ तास करायची कृती आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *