प्राधान्ये आणि सवयी
खूपदा माझ्याशी बोलायला पालक येतात. मला सांगतात की, “माझा मुलगा chain smoker झाला आहे. त्याची या सिगरेटपासून सुटका करा.” मी जेव्हा त्या मुलाशी एकट्याशी संवाद साधतो, त्याला विचारतो की याची सुरुवात कशी झाली तेव्हा मला अगदी अपेक्षित असंच उत्तर मिळतं ते म्हणजे, “बस्स! मला फक्त एकदा हा अनुभव घ्यायचा होता. मला फक्त एकदा सिगरेट ओढून बघायची होती. पण जसजसे मी सिगरेट ओढत गेलो तसतसे मी स्वतःची अशी समजूत घालत होतो की मी काही सिगरेटच्या आहारी गेलो नाहीये, मी अधेमधेच सिगरेट ओढतो.” मी प्रसंगपरत्वे सिगरेट ओढतो असे म्हणता म्हणता दोन प्रसंगांमधील अंतर कधी कमी होत गेले हे ना त्याला समजले ना त्याच्या पालकांना. त्याने आई वडिलांकडे याची कबुली तर दिली पण तोवर तो अट्टल chain smoker झाला होता.
आत्ताचं जे हे उदाहरण आहे ते फक्त सिगरेट ओढण्याशीच थांबत नाही. जर ही उदाहरणे तुम्हाला अतिशयोक्तिपूर्ण वाटत असतील तर मी तुम्हाला माझ्या कॉलेजमधील एका मुलाचे उदाहरण देतो. “तू अभी अंडे में है, तू नही समझेगा” हे वाक्य म्हटल्याशिवाय त्या मुलाचं कोणतंच बोलणं पूर्ण होत नसे. ही त्याची सवय त्याच्या इतकी नसानसात भिनली होती की आता तो मित्रांशी जितक्या सहजतेने हे वाक्य बोलायचा तितक्याच सहजतेने प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतानाही त्याचं हे परवलीचं वाक्य तो म्हणू लागला. हळू हळू प्राध्यापकांना याचा राग येऊ लागला. ते सुरुवातीला त्याचं बोलणं हसण्यावारी न्यायचे पण नंतर नंतर चिडायला लागले. हे वाक्य म्हणण्याची इतकी हद्द झाली की एका तोंडी परीक्षेच्या वेळीही त्याने प्राध्यापकांना उत्तर देताना शेवटी हेच वाक्य म्हटले. आणि त्यांनी त्याला नापास केले. शक्यतो तोंडी परीक्षेमध्ये कधी कुणाला नापास करत नाहीत. तो नापास झाला कारण त्याने त्याची ही बोलण्याची सवय अंगात भिनेपर्यंत त्यावर लक्षच दिले नाही आणि त्याच बोलण्यामुळे चिडून प्राध्यापकांनी त्याला नापास केले.
तुमची प्राधान्ये जाणीवपूर्वक निवडा कारण ज्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊ लागतो त्याच गोष्टी अलगदपणे आपल्या सवयी बनतात. सकाळी उठल्यावर मी प्रामुख्याने चहा पितो असं म्हणता म्हणता नंतर नंतर एखाद्याला सकाळी चहा मिळाला नाही तर डोकं दुखायला लागतं किंवा एखाद्याला दिवसाची सुरुवातच अजून झाली नाही असं वाटायला लागतं कारण आता सकाळी चहा पिणं ही सवय झालेली असते. त्यामुळे प्राधान्यांची निवड काळजीपूर्वक करा, कारण प्राधान्ये बदलता येतात पण सवयी मोडाव्या लागतात!