प्रयत्न करणं का थांबवायचं नाही?

तुम्हाला चहा कसा करतात ते माहितीच असेल! आपण चहा करताना पाणी उकळायला ठेवतो. त्यात चहाची पावडर, दूध, साखर घालतो आणि ते मिश्रण गरम होण्याची वाट बघतो. साधारण १००0 C  तापमानाला ते मिश्रण उकळायला लागतं आणि चहा तयार होतो. महत्त्वाचं काय तर गॅसवर पाणी तापायला ठेवल्यापासून ते उकळून चहा तयार होईपर्यंतच्या प्रवासाला काहीतरी वेळ लागतो. मग भलेही तो काही सेकंद, २ मिनिटं किंवा ५ मिनिटं असेल. समजा चहा कडक हवा तर अजून वेळ लागेल. किती माणसांसाठी चहा करताय त्यावरही वेळ बदलेल. मात्र हे नक्की की आपण चहासाठी गॅसवर पाणी  ठेवल्या ठेवल्या आपल्याला उकळलेला चहा मिळत नाही. काही वेळ वाट बघायला लागतेच! जरी आपण पाणी उकळण्यापासून ते चहा तयार होण्याचा प्रवास संपूर्ण पहिला नाही तरीही गॅसवर ठेवलेले पाणी उकळणार आहे आणि चहा तयार होणार आहे यावर आपला पूर्ण विश्वास असतो.

चहा तयार होतानाच्या या प्रक्रियेवर आपण जसा विश्वास ठेवतो तसाच विश्वास आपण आपल्या आयुष्यातील इतर गोष्टींवरही ठेऊ शकतो का? उदाहरणार्थ, समजा आपण एखादी गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे आणि पुढच्या एक, दोन दिवसांतच ती गोष्ट मिळाली नाही, तर आपण कित्येकदा आपले प्रयत्न लगेचच सोडून देतो. म्हणजेच काय तर चहा करण्यासाठी पाणी गॅसवर ठेवले, गॅस चालू केला आणि पाणी उकळलेले दिसत नाही म्हणून लगेच गॅस बंदही केला. असेच झाले ना? पण असं केलं तर आपल्याला चहा नक्कीच मिळणार नाही. तसंच प्रयत्नच सोडले तर ध्येय साध्य होणारच नाही.

प्रयत्न करत राहायचे आहेत कारण तेच प्रयत्न पडद्यामागून तुमच्या ध्येयाला हात धरून तुमच्याकडे खेचून आणणार आहेत. आत्ता या क्षणाला ते ध्येय साध्य झालेलं तुम्हाला दिसणार नाही, इतकंच!

It is working out for you behind the curtain, even if you do not see it now!

-GuruShree

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *