परीक्षेच्या काळात gadgets का वापरू नयेत?
शाळेची परीक्षा असो, कॉलेजची असो वा एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची असो, परीक्षा जवळ आली की प्रत्येकजण आपापल्या परीने तयारीला लागतो. परीक्षेच्या तयारीची प्रत्येकाची एक स्वतंत्र पद्धत असते. ही तयारी करताना कोणत्या गोष्टी कराव्या यासाठी अनेकजण सल्लेही देतात. मी मात्र आज तुम्हाला परीक्षेच्या नजीकच्या काळात नेमके काय करु नये हे सांगणार आहे.
तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही टीव्हीसमोर बसला आहात. टीव्हीवर एखादी क्रिकेटची मॅच किंवा एखादी मालिका पाहिलीत. आणि ती बघून झाल्यावर तुम्ही पुन्हा अभ्यासातील गोष्टी आठवायचा प्रयत्न करायला लागलात आणि मग तुमच्या असं लक्षात आलं की तुम्ही टीव्ही पाहण्यापूर्वी जो अभ्यास केला होता, ज्याची उजळणीही केली होती, जो तेव्हा तुमच्या संपूर्ण लक्षात होता, त्या अभ्यासातील बराचसा भाग आता टीव्ही पाहून झाल्यावर मात्र तुमच्या लक्षात नाहीये, तो तुम्ही विसरला आहात. आता तुम्हाला पुन्हा उजळणी करण्याची गरज आहे.
हे असं होतं कारण तुमच्या मनावर अभ्यासाचा जो एक थर तुम्ही तयार केला होता त्यावर gadget ने दिलेल्या माहितीचा अजून एक थर चढला. परीक्षेच्या वेळेपर्यंत तुमच्या मनावर फक्त तुम्ही केलेल्या अभ्यासाचा थर असायला हवा होता. त्याऐवजी gadget ने दिलेल्या माहितीचा थर अभ्यासाच्या थरावर आला. आता तुमच्या मनावर जो gadget चा नवीन थर आहे त्यामुळे आधीचा, अभ्यासाचा थर हळूहळू धूसर होऊ लागतो आणि तुम्हाला अभ्यासातील गोष्टी आठवणं थोडं अवघड जातं. त्यामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासाची उजळणी झाल्यावर कोणत्याही gadget समोर बसायचं नाही.
तुमची परीक्षा अगदी एका दिवसाने, आठवड्याने किंवा भलेही एका महिन्याने असो, परीक्षेच्या या काळात एकदा अभ्यास आणि revision झाली की मोबाईल फोन, टीव्ही किंवा टॅब या सारख्या कोणत्याही gadget कडे पाठ फिरवा. ही उपकरणं वापरू नका. यामुळे जेव्हा तुम्ही परीक्षेतील प्रश्न सोडवायला सुरुवात कराल तेव्हा त्या उत्तरांचा थरच तुमच्या मनावरचा पहिला थर असल्याने तुम्हाला उत्तरं लिहिणं आणखीन सोपं जाईल.