नियमितपणे व्यायाम करायला सुरुवात कशी करायची?

व्यायाम आपल्या स्वास्थ्यासाठी तो अत्यावश्यक आहे हे आपल्याला माहिती असतं, त्यामुळे होणारे फायदे आपल्याला माहिती असतात, आपल्याला व्यायाम करायची इच्छा सुद्धा असते, मात्र तरीही  व्यायाम करण्यासाठी आपण चालढकल करत असतो. याच चालढकलीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आज मी एक युक्ती सांगणार आहे.

व्यायामाला सुरुवात करताना आपण काहीतरी एक गोष्ट करायची ठरवतो. समजा आपण असं ठरवलं की उद्यापासून दररोज सकाळी मी ३० मिनिटे चालायला जाणार आहे. तर आपण दुसऱ्या दिवशी उठतो आणि चालायला जायला निघतो. ३० मिनिटे चालण्याचे ध्येय ठरवलेले आहेच त्याप्रमाणे चालून घरी परत येतो. पुढचे १ ते २ दिवस हे चालणं होतं आणि आठवडाभरातच आपल्याला चालण्याचा कंटाळा येऊ लागतो. आपली अळमटळम चालू होते. सकाळी उठून चालायला जाण्याऐवजी अंथरुणावरच पडून राहायचे किंवा आजचा दिवस दांडी पण उद्यापासून नक्की असे म्हणून वेळ टाळून न्यायची असं आपण करायला लागतो.

असं होतं कारण सकाळी चालायला सुरुवात केल्यावर आपल्या मनात चालण्यापेक्षाही ३० मिनिटे हा आकडा घर करुन राहतो. यासाठीच एक युक्ती सांगतो. व्यायामाला सुरुवात करताना ठरवायचं काय? तर ३० मिनिटे चालणे किंवा १०० दोरीच्या उड्या मारणे असंच ठरवायचं. पण चालायला सुरुवात केली की १५ मिनिटे झाल्यावरच थांबायचं, ५० उड्या झाल्या की लगेच थांबायचं आणि आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात करायची. याने होतं काय की, ‘करायला घेतलेले काम अपूर्ण राहिले आहे’ असा संदेश आपल्या मनाला मिळतो. आता उरलेले १५ मिनिटांचे चालणे किंवा उरलेल्या ५० उड्या कधी पूर्ण करायच्या याचाच विचार मनात सतत घोळत राहतो. याच गोष्टीचा फायदा दुसऱ्या दिवशी सकाळी चालायला निघालात किंवा उड्या मारायला लागलात की होतो. आता आपलं मन तर तो अपूर्ण राहिलेला व्यायाम करायला उत्सुकच असतं, व्यायाम करायला ते लगेच तयार होतं.

आपल्या मनाचा एक गुणधर्म आहे, त्याला कोणतेही काम अर्धवट करुन सोडणं त्याला रुचत नाही. आपल्याला कोणीतरी कोडं घातलं तर त्याचं उत्तर मिळेपर्यंत ते कोडं आपल्या मनात घोळत राहतं. मनाचा हाच गुण आपण आपल्याच फायद्यासाठी वापरायचा. ३० मिनिटे चालण्याचे ठरवायचे पण १५ च मिनिटे चालायचे. यामुळे उरले १५ मिनिटे चालण्यासाठी उद्याच्या दिवसाची वाट आपलं मनच बघायला लागतं. हे technique वापरुन तुम्ही हळूहळू रोज व्यायाम करण्यासाठी तुमच्या मनाला तयार करु शकता, तशी शिस्त लावू शकता. फक्त एकच करायचं, जितका वेळ व्यायाम करायचे ठरवले आहे त्यापेक्षा कमी वेळ व्यायाम करुन त्यादिवशी थांबायचे आहे. बघा करुन काय घडतंय ते.

2 Comments

  • perfect solution for mi thanks

  • Grushree Namste!
    Hello! Thank you for the advice for exercise.
    Thank you.
    Lalita

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *