नात्यात दुरावा येऊ नये म्हणून काय करावं?
मला एका व्यक्तीने असं विचारलं होतं की ‘आमच्या लग्नाला अनेक वर्ष झाल्यावर आता असं घडतंय की अगदी एखाद्या छोट्याश्या कारणाने सुद्धा जर आमच्यात थोडासा दुरावा आला तर तो दुरावा खूप दिवस किंवा प्रसंगी खूप महिने सुद्धा टिकतो. हे असं का बरं होतंय?’ हा प्रश्न गंभीर आहे. अनेकजणांना हा प्रश्न भेडसावतो.
या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करायला लागेल. ज्याप्रमाणे एखादी नवीन इमारत बांधत असताना आणि ती नवीन असताना आपल्याला तिची कमीत कमी निगराणी राखायला लागते, मात्र तीच इमारत जसजशी जुनी व्हायला लागते, तिची जास्त काळजी घ्यायला लागते, किंवा असं म्हणूया की ती high maintainence होत जाते. अगदी हाच नियम नातं टिकवण्यासाठी लागू पडतो.
वर्षानुवर्षांचा आपला गैरसमज आहे की ‘नातं जितकं जुनं असतं तितकं ते आपोआप टिकतं!’ मात्र असं नसतं. सत्य हे आहे की जितकं जुनं नातं, तितका maintainence जास्त! कारण अनेक वर्ष एकमेकांना ओळखल्यामुळे ‘एवढं तर तुला माहिती पाहिजे’ ही अपेक्षा कधी ना कधीतरी आपल्या मनात डोकावते. बोलून नाही दाखवली तरीही ही अपेक्षा आपल्याला वर्तनात येते आणि त्यामुळे असे काही प्रसंग घडतात जे नात्यांमध्ये दुरावा येण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे असं घडू नये म्हणून एकच गोष्ट करायची आहे. तुम्ही तुमच्या नात्यांवर ‘मी या नात्यावर काम केलं तरच हे नातं टिकेल’ या पद्धतीने काम करायचं आहे. असं केलंत तर तुमचं नातं आणखीन दृढ होईल, नाहीतर ३ किंवा ४ महिन्यात त्याच नात्यात दुरावा यायला सुरुवात होईल. नातं टिकवण्यासाठी काम नाही केलं तर नातं आणखी खुलण्याऐवजी ते आणखीन संकुचित होण्याचं धोका असतो. जे नातं आपल्याला आनंद देतं तेच नातं आपल्या दुःखाचं कारण ठरू शकतं. असं घडू नये यासाठी आत्ता सांगितलेल्या उपायावर विचार करा आणि त्याला जरूर अंमलात आणा!