ध्यान करताना येणारे अडथळे कसे पार करावेत?
आपल्या आत दडलेल्या प्रत्येक कौशल्याला ओळखून त्या कौशल्याचा विकास करण्यासाठी ध्यान हे एक सहज आणि सुंदर साधन आहे. ध्यान करायची सुरुवात करताना मात्र अनेक
अडचणींना सामोरं जावं लागतं. या अडचणींपैकी एक म्हणजे ध्यान करायला आपण बसलो की आजूबाजूचे अनेक आवाज आपल्याला यायला सुरुवात होते!
बघा हं, आपण दिवसभरातील एक वेळ स्वतःसाठी ठरवून ध्यान करायला बसतो. डोळे बंद करतो आणि नेमके त्याचवेळी आपल्याला वाहतुकीचे आवाज ऐकू येतात, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायला लागतो, शेजारच्या घरातून टीव्हीचा आवाज ऐकू यायला लागतो! टीव्हीवर नक्की काय चालू आहे ते ऐकू येत नसतं, पण आवाज आहे हे आपल्याला कळत असतं. आणि मग आपण म्हणतो की आवाजांच्या या गदारोळात ध्यानासाठी मन एकाग्र होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या या आवाजांचा उपयोग करूनच आपण आपले चित्त एकाग्र करु शकतो का?
म्हणजे तुम्ही ध्यानासाठी बसा, डोळे बंद करा आणि येणारे सर्व आवाज ऐका. ऐकू येणाऱ्या या प्रत्येक आवाजाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. आता दोन मिनिटांनी त्यातील एका आवाजाला, उदाहरणार्थ टीव्हीच्या आवाज ऐकणं थांबवायचं आहे आणि वाहतुकीच्या आणि कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचे आहे. लक्ष इतकं केंद्रित करायचं की आता वाहतुकीच्या आवाजात दुचाकीच्या firing चा आवाज येतोय की कारच्या, ट्रकच्या, बसच्या firing चा आवाज येतोय हे ही स्पष्टपणे ओळखता यायला पाहिजे. यामुळे आपोआपच आपला focus वाढेल आणि ध्यानाला सुरुवात होईल.
आता हळूहळू हा वाहतुकीचा आवाजसुद्धा ऐकणं थांबवायचं आहे आणि संपूर्ण लक्ष फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजावर केंद्रित करायचे आहे. कुत्रा भुंकेल ते लक्ष देऊन ऐकायचे आहे. तो थोडावेळ भुंकणार नाही, त्यावेळी त्याच्या पुन्हा भुंकण्याची वाट पाहायची आहे आणि तो पुन्हा भुंकायला लागला की त्याचं भुंकणं लक्षपूर्वक ऐकायचे आहे. जर १० मिनिटांसाठी आपण कुत्र्याच्या भुंकण्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करु शकलो जे करायला आपण बसलो आहोत तेच साध्य होईल, नाही का? लक्ष एकाग्र करायलाच तर आपण बसलो होतो. म्हणजेच जे आपल्याला साधायचे आहे त्याची सुरुवात तर झाली आहे. आता हळूहळू ३ ते ४ महिन्यांच्या सरावाने आपल्याला ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जाणं शक्य होऊ लागेल, सरावाने सोपं वाटू लागेल. जर इतक्यातच तुम्ही ध्यान करायला सुरुवात केली असेल तर या पद्धतीने दररोज ध्यान करून बघा. आपलं चित्त अनेकाग्रांवरून एकाग्र करायला जमलं की मग ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जाणं सोपं होतं.
1 Comment
अतिशय सोप्या पद्धतीने उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद🙏