देवाच्या मूर्तीकडे पाठ करून का बसू नये?
माझ्या लहानपणी माझी आई नेहमी मला सांगायची की ज्या ठिकाणी देव आहेत किंवा जिथे त्यांची पूजा केली जाते, त्या बाजूला कधीही पाठ करुन बसू नये. इतकंच नाही तर कोणी जर देवघराच्या खोलीत झोपणार असेल तर तेव्हाही ती आवर्जून सांगायची की देवाकडे पाठ करुन झोपू नका. मला लहानपणी अनेक माणसांनी असेही सांगितले होते की देवळात जाताना जसे देवाच्या मूर्तीकडे पहात आपण दर्शन घेतो तशाच प्रकारे, मूर्तीकडे पहातच उलटे चालत चालत देवळातून बाहेर पडावे. देवाकडे कदापिही पाठ करु नये. “असे का?” या प्रश्नाचे उत्तर मला लहानपणी मिळाले नव्हते. कदाचित माझ्या आईला आणि तिला ज्यांनी हा नियम सांगितला त्यांना सुद्धा याचे उत्तर माहीत नसावे. पण आज मात्र मी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहे.
घरातील देवघराच्या खोलीत बसून सकाळपासून दिवसभर कोणी ना कोणी पूजा-पाठ करत असतं. कोणी ‘हनुमान चालीसा’ म्हणतं तर कोणी अजून काही. प्रत्येकजण तिथे बसून पूजा, स्तोत्र-पठण, जप, जे काही करतात त्यातून त्या जागेची सकारात्मक ऊर्जा वाढत राहते. आमच्या घरी माझे वडील सकाळी देवपूजा करायचे. त्यानंतर तिथेच बसून माझी आई काही पठण करत असे. संध्याकाळी मलाही तिथेच बसून भगवद्गीता, हनुमान चालीसा म्हणायला सांगितले जायचे. या सगळ्यामुळे देवघराची जागा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे एक असे स्थान तयार झाले होते की जिथून ज्याला अशी सकारात्मक ऊर्जा हवी आहे त्याला ती तिथून मिळू शकत होती. दिवसभर, घरातील प्रत्येकाने तिथे बसून आपापल्या परीने तिथली ऊर्जा अधिकाधिक सकारात्मक करण्यासाठी हातभार लावलेला असायचा.
आता हीच सकारात्मक ऊर्जा जर आपल्याला हवी असेल तर देवांकडे पाठ करुन बसलो तर ती नक्कीच मिळणार नाही. का बरं? आपल्या शरीरात जी ऊर्जाचक्रे असतात त्यातील बहुतेक सर्व ही आपल्या शरीराच्या छातीकडच्या बाजूने उघडतात. पाठीकडच्या बाजूने उघडत नाहीत. त्यामुळे जर आपल्या छातीच्या समोर जर देव असतील तर जो सकारात्मक ऊर्जेचा मोठा साठा त्या देवांच्या स्थानापाशी आहे, तीच ऊर्जा आपल्या सर्व चक्रांमध्ये येऊ लागेल.
म्हणजेच ‘देवांकडे पाठ करु नये’ असा नियम नव्हता तर देव नेहमी आपल्या छातीच्या, पोटाच्या किंवा नाभीकडच्या बाजू समोर असावा असा नियम आहे. परंतु आपल्या पिढीपर्यंत येताना हा नियम उलटा झालेला दिसतो. खरे कारण हेच आहे की सकारात्मक ऊर्जेचा जिथे मोठा साठा आहे त्या स्थानाकडे जर आपण आपल्या शरीराची पोटाकडची, छातीकडची किंवा नाभीकडची बाजू करुन बसलो तर ती ऊर्जा आपल्या शरीरातील ऊर्जा चक्रांद्वारे आपल्या आत येईल.
2 Comments
Khupch chan mahiti actually kharach chukicha msg amchya prynt pohochat ala ahe aai baba na vicharyche tar te sangyche ki amhla pan amche aai baba ni sangitle amhi aikle amhi ulat prashna kele nahit tu pan Karu nakos Ani sangte tasa kar
Pan Aaj gurushree ni mule khara kai tymage nakki kai logic ahe te Kalla
Thanku Gurushree 🙏🏻
खूपच छान माहिती आज समजली
खुप खुप
धन्यवाद 🙏