डायरी लिहिणे – व्यक्तिमत्व विकासासाठी एक प्रभावी सवय!

आपल्या इतिहासाचा धांडोळा घेताना अशी अनेक व्यक्तिमत्त्वे दिसतात ज्यांनी स्वतःची एक वेगळी छाप इतिहासाच्या पानांवर उमटवलेली आहे. या व्यक्तींचे नाव अतिशय अभिमानाने घेतले जाते. राजकारण असो, व्यापार – उद्योग असो किंवा कला क्षेत्र असो. प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार करणारी माणसे दिसतात. महात्मा गांधी किंवा राहुल बजाज यांसारख्या व्यक्तींकडे बघितले तर लक्षात येते की प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यातील सवयी ह्याच प्रत्येकाची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. एखाद्याचे व्यक्तिमत्व घडताना या सवयींचा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. आज मी अशाच एका सवयीबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे. ही सवय जवळपास सर्वांना माहीत आहेच. आपण नेहमी ऐकली आहे. पण त्याचा नक्की फायदा काय हे माहीत नसल्यामुळे आपण ती सवय सहजपणे अंगिकारत नाही. ही सवय आहे – ‘रोज रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहिण्याची सवय’. हो, महात्मा गांधीजींना पण रोज डायरी लिहिण्याची सवय होती. बिल गेट्स, राहुल बजाज, एल एन मित्तल यांनाही ही सवय आहे आणि या सवयीप्रती ते अत्यंत कृतज्ञ आहेत. दररोज रात्री आज दिवसभरात काय काय झाले त्याचा लेखा-जोखा लिहूनच ते झोपतात. ही सवय त्यांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.

ही सवय इतकी महत्त्वाची का आहे? या सवयीमुळे काय साध्य होणार आहे? एवढ्या छोट्या सवयीमुळे असा काय फायदा होणार आहे? याचं तर्कशुद्ध कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे. असं समजू की आपलं मन म्हणजे मोबाईलची एक बॅटरी आहे. या बॅटरीचा उपयोग आपण विचार करण्यासाठी करतो, झालेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी करतो आणि मग त्यातून उरेल त्या बॅटरीचा उपयोग भविष्यातील योजनांचा विचार करण्यासाठी करतो. ही जी उर्वरित बॅटरी आहे तीच मग आपल्याला भविष्यातील योजनांचा विचार करताना, कल्पकता वापरताना उपलब्ध असते. परंतु जेव्हा आपण आपल्या डोक्यातील गोष्टी, जे आज आपल्याला माहीत आहे ते डायरीत किंवा एखाद्या कागदावर लिहून काढतो तेव्हा ताबडतोब आपल्या मनाला हे समजते की आता या लिहिलेल्या गोष्टी मला मुद्दाम लक्षात ठेवायची गरज नाही. आणि मग आपलं संपूर्ण मन, त्यांची पूर्ण बॅटरी ही आता भविष्यातील योजनांचा, आपल्याला काय काय साध्य करायचे आहे त्यासाठी करण्याच्या नियोजनाचा विचार कल्पकतेने करण्यासाठी उपलब्ध होते.

हे अगदी साधे आणि तर्कशुद्ध कारण आहे. ज्या लोकांना ही डायरी लिहिण्याची सवय आहे त्यांना कदाचित हे तर्कशुद्ध कारण माहीतही नसेल परंतु या सवयीचा फायदा त्यांना निश्चितच झालेला आहे. जर आपणही दररोज अशी डायरी लिहू लागलो तर तुमच्या हे ही लक्षात येईल की तुमच्या कामातली  कल्पकता वाढली आहे. आता तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे त्याबद्दलचे नियोजनाचा विचार करण्यासाठी तुमचे पूर्ण मन रिकामे आहे. आधीच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आता मनाची बॅटरी वापरावी लागत नाही आणि मन तुमच्या भविष्यासाठी आणि कल्पकतेने काम करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करु लागते. या सवयीचा स्वतः अनुभव घेतला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *