घरातील आनंद कसा वाढवायचा?

काही दिवसांपूर्वी मी एक ऐतिहासिक सिनेमा बघितला. त्यात एक वडील आपल्या मुलाला सांगत होते की जेव्हा एक योद्धा त्याची तलवार स्वतः तयार करतो, तेव्हा त्या योद्ध्याचा त्याच्या तलवारीवरचा विश्वास दुप्पट होतो. साधारण त्यासुमारास मी अजून एक clip पाहिली होती ज्यात एका अभिनेत्याविषयी बोलत होते- जेव्हा त्या अभिनेत्याकडे त्याच्या सिनेमाची script यायची, तेव्हा तो त्या script मधले त्याचे dialogues स्वतःच्या हाताने लिहायचा. आणि मग script मध्ये न बघता, त्याच्याच हस्ताक्षरात लिहिलेले dialogues बघून पाठ करायचा. हा अभिनेता इतका प्रसिद्ध होता की केवळ तो सिनेमात काम करत असल्याने सिनेमाची किमान १०० कोटी रुपयांची कमाई होणार हे निश्चित असायचं! मला आठवतंय की कॉलेजमध्ये जे toppers असायचे तेसुद्धा अभ्यास करताना पुस्तकातून अभ्यास न करता स्वतःच्या notes काढून त्यातून अभ्यास करायचे. या सवयीची त्यांना rank मध्ये यायला मदत व्हायची. पुस्तकातून notes आणि notes मधून अभ्यास हा क्रम त्यांच्यासाठी पक्का झालेला होता.

या सगळ्याचा घरातील आनंद वाढवण्याशी काय बरं संबंध?

जेव्हा एक कुटुंब एका घरात राहतं, तेव्हा त्या कुटुंबातील सर्व सदस्य घरातील कामं वाटून घेतात- कोणी भांडी घासतं, कोणी स्वयंपाक करतं, कोणी फरशी पुसतं. अशावेळेस जर तुमच्याकडे आठवड्यातून एखादं काम आलं, तर मी म्हणेन की ते काम तुम्ही स्वतःहून जास्त वेळेस घ्या. कारण कसं होतं की जेव्हा आपण त्या जमिनीवरून चालतो जी आपण पुसलेली आहे तेव्हा आपसूकच आपल्याला छान वाटायला लागतं कारण ती जमीन आपण पुसलेली असते! तसंच, जेव्हा कोणाला तुम्ही पोळी करून खायला घालता तेव्हा तिच्याबरोबरच तुमचं bonding आणखीन घट्ट होतं कारण ती व्यक्ती तुम्ही केलेली पोळी खात असते. तसंच आपल्या घरातला केर आपण काढल्याने त्या घराबरोबरचं आपलं bonding वाढतं!

जर एका योद्ध्याचा त्याने बनवल्यामुळे त्याच्या तलवारीचा विश्वास वाढत असेल तर हेच principle आपल्या घरासाठीसुद्धा लागू होतं. घरातल्या जबाबदाऱ्या जर आपण आपल्या कुटुंबात वाटून घेतल्या तर आपण ज्या घरात राहतो, त्या वास्तूसाठी आपण स्वतः काही केल्याने, त्याच वास्तूत राहताना आपण आधीपेक्षा जास्त आनंदी होतो. एकदा स्वतःहून घरातील आरसा स्वच्छ करून किंवा कपाटाच्या खालून केर काढून बघा, तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय.

जर स्वतःहून जबाबदारी घेऊन तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाने घरातलं काम केलं तर तुमचं तुमच्या घरावरचं, घरातील सदस्यांवरचं प्रेम वाढलेलं तुम्हाला आढळेल आणि नक्कीच यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील आनंद वाढलेला जाणवेल! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *