आपल्याला भेटलेला प्रत्येक जण हा आपला गुरू असतो!
कोणताच मनुष्य हा ‘स्व-निर्मित’ किंवा फक्त स्वतःच्याच प्रयत्नांनी पुढे आलेला असा नसतो. किती सुंदर वाक्य आहे हे की – ‘केवळ स्व-निर्मित असा माणूस नसतो’. कोणत्याही माणसाच्या जडण घडणीत केवळ त्याच्या स्वतःच्याच प्रयत्नांचा वाटा आहे असे कधीच नसते. आपल्या शाळा-कॉलेजमधील शिक्षकांनी आपल्यावर केलेले संस्कार, आपल्याला वेळोवेळी दिलेले ज्ञान, आपल्या आई वडिलांचे आपल्या शिक्षणासाठी असलेले योगदान किंवा अगदी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ज्यांनी काही संकल्पना आपल्याला समजावून सांगितल्या असतील, त्या सगळ्यांचा आपल्या जडणघडणीत वाटा असतो. या सर्वांच्या योगदानाची गोळा बेरीज म्हणजेच आपलं आत्ताचं स्थान असतं.
गुरुपौर्णिमेचा संदर्भ आला की मला नेहमीच एक गोष्ट आठवते. एकाच आई वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या दोन जुळ्या भावांची गोष्ट. हे दोन्ही भाऊ परस्पर विरुद्ध आयुष्य जगत होते. एकाचे आयुष्य दारूच्या नशेत वाया गेले होते तर दुसरा भाऊ मात्र ४५० लोकांना हाताशी घेऊन स्वतः उभ्या केलेल्या इंडस्ट्रीची प्रगती कशी करता येईल या विचारात गुंग झाला होता. ते दोघे जेव्हा ४० वर्षांचे झाले तेव्हा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या दिवशी तुमच्या या आयुष्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जो दारूच्या आहारी गेला होता त्याने उत्तर दिले की, त्याचे वडील दारूडे होते. ते रोज दारू पिऊन आईला मारायचे. मग तो पण दारूडाच होणार ना? त्याशिवाय तुम्ही अजून कोणती वेगळी अपेक्षा करुच शकत नाही. हाच प्रश्न जेव्हा दुसऱ्या भावाला विचारला गेला तेव्हा त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या वडिलांनाच दिले. पत्रकारांना याचे आश्चर्य वाटले. तेव्हा तो भाऊ म्हणाला की मी माझ्या वडिलांकडून मी कसे वागायचे नाही, काय करायचे नाही हे शिकत गेलो. ते जे करत होते ते न करता त्याच्या विरुद्ध गोष्टी करत राहिलो आणि आज माझं आयुष्य कसे घडले आहे हे तुम्ही पहातच आहात. ही गोष्ट इथेच संपते. दोन जुळ्या भावांपैकी एक भाऊ सांगतो की तो त्यांच्या वडिलांसारखा आयुष्य जगला आणि त्याचं आयुष्य वाया गेलं. दुसरा भाऊ सांगतो की त्याचेही गुरू हे त्यांचे वडीलच आहेत पण काय करायचं नाही हे तो त्यांच्याकडून शिकला. आणि त्याचं आयुष्य घडलं.
यातून मी एक धडा घेतला की माझ्या समोर येणारा प्रत्येक माणूस हा माझा गुरू आहे. तो मला कसे वागायचे किंवा कसे नाही वागायचे यापैकी काहीतरी एक शिकवत आहे. माझे तुम्हालाही असेच सांगणे आहे की जोवर तुम्ही एखाद्या माणसाकडून यापैकी काहीतरी एक शिकत नाही तोवर त्याला तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका. जगामधे प्रत्येकजण आपल्याला गुरुस्थानीच आहे.