आपल्याकडे असलेले कौशल्य व आपली कर्मभूमी

एखाद्या गोष्टीची खरी गरज कुठे आहे हे आपल्याला ओळखता यायला हवे. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. एखाद्या उष्ण हवेच्या प्रदेशात आपल्याला दिवसातून एक कप चहा सुद्धा प्यावासा वाटत नाही. पण तोच चहा एखाद्या थंड हवेच्या प्रदेशात दिवसातून कितीही वेळा घेतला तरी चालतो. ज्या चहाची गरज थंड प्रदेशात वारंवार भासते तोच चहा उष्ण हवेच्या ठिकाणी नकोसा होतो. वस्तू एकच आहे पण प्रदेशानुसार तिचे महत्त्व बदलते.

आता हीच गोष्ट आपल्या आयुष्यात कशी लागू होते ते आपण पाहू. एखादी गोष्ट, एखादे कौशल्य ज्या ठिकाणी सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे नव्याने त्याच गोष्टीची किंवा कौशल्याची गरज भासत नाही. समजा पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही अकाऊंटंट आहात. सातत्याने नोकरीच्या शोधात आहात पण या शहरांमध्ये तुम्हाला लवकर नोकरी मिळत नाही. पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात जिथे आधीपासून बरेच जण याच प्रकारचे काम करत आहेत, जिथे या कामासाठी आधीच बरीच माणसे उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी नव्याने अकाऊंटंट म्हणून काम मिळणे हे सहज सोपे नाही कारण त्या कौशल्याची तिथे आत्ता गरजच नाहीये.

याऐवजी ज्या ठिकाणी त्या कौशल्याची खरी गरज आहे, अशा प्रकारचे काम करणाऱ्या माणसांची जिथे उणीव आहे अशा ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी शोध घेतलात तर तुम्हाला कदाचित ताबडतोब नोकरी मिळू शकते. एवढेच नाही तर असे काम करणाऱ्या माणसाची तिथे नितांत गरज असल्याने तुम्हाला तिथल्या कंपनीकडून पगाराव्यतिरिक्त अजून अनेक सुविधासुद्धा उपलब्ध करुन दिल्या जातील. जिथे या प्रकारचे काम उपलब्ध आहे पण ते काम करायला माणसे नाहीत अशा ठिकाणी तुमच्या कौशल्याला मागणी असते. त्याठिकाणी तुम्ही काम करायला तयार झालात की तिथे तुमची हमखास भरभराटही होते. पगारवाढ, मान-सन्मान, कंपनीकडून विविध संधीही अगदी सहजपणे प्राप्त होतील.

दार्जिलिंगचा चहा इतका सुप्रसिद्ध आहे. पण उष्ण प्रदेशात त्याला कोणी सारखे विचारणार नाही. उलट थंड प्रदेशात त्याला सतत मागणी असेल. असेच तुमच्या अंगच्या कौशल्याचे पण आहे. ज्या प्रदेशात तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याची गरज आहे त्या प्रदेशाचाच स्वतःची कर्मभूमी म्हणून तुम्ही स्वीकार केलात तर तुमच्या आयुष्याचा सर्व बाजूंनी विकास होऊ लागेल.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *