आपली साधना – आपला फायदा

आजच्या ब्लॉगच्या सुरुवातीला मी एका मुलीचं उदाहरण तुम्हाला देणार आहे. जेव्हा ही मुलगी लहान होती, तेव्हा एके दिवशी तिच्या आईने तिला सांगितलं की, “घरातील सर्वजण या एका मंत्राचा जप करतात, म्हणून तू सुद्धा आजपासून हा जप करायला सुरुवात कर.” आईचं ऐकून तिने तो जप करायला सुरुवात केली. पुढे जेव्हा ती शाळेत जायला लागली तेव्हा एका गुरुजींनी तिचा अभ्यास चांगला व्हावा यासाठी एक साधना करायला सांगितली. त्यांनंतर जेव्हा तिचं लग्न झालं, तेव्हा तिच्या सासरी सर्वजण एका देवाची उपासना करायचे, म्हणून तिच्या नवऱ्याबरोबर ती दररोज त्या देवाच्या मंदिरात जायला लागली. तीनही गोष्टी तिच्या दिनक्रमाचा भाग बनल्या होत्या. काही काळाने मात्र तिला असं वाटायला लागलं की या तीनपैकी एकच कोणतीतरी गोष्ट तिने संपूर्ण लक्ष देऊन, आनंदाने करायला हवी. बाकी दोन गोष्टी करणं बंद करु. मात्र आजवर चालू असलेली कोणतीही साधना अशी अचानक बंद केली, तर त्यामुळे काही नुकसान होईल का? अशी तिला भीती वाटत होती.

तिच्या याच प्रश्नाच्या अनुषंगाने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मंत्रजप, साधना आणि देवदर्शन यापैकी कोणतीही गोष्ट ही आपल्याच फायद्यासाठी असते. आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळवून देणारी असते. देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याने फायदा आपला होतो, देवाचा नाही!

जर कधी तुम्हाला असं वाटलं की मी रोज मंदिरात जातो पण आज जाऊ नाही शकलो, आता माझ्याबाबतीत काही बरं-वाईट घडेल का? तर मी हे सांगू इच्छितो की असा विचार तुमच्या मनाला शिवूनसुद्धा देऊ नका! मंत्रजप, साधना आणि देवदर्शन यांमुळे आपला फक्त आणि फक्त फायदाच होतो! त्यामुळे हे थांबवल्याने तुमचं नुकसान तर नाही होणार, परंतु या गोष्टी तशाच चालू राहिल्याने, ती positive vibrations घेतल्यामुळे तुम्हाला जो फायदा झाला असता, ते मात्र घडणार नाही. फायदा न होणं याला आपण नुकसान म्हणू शकतो, पण यापेक्षा जास्त काही होणार नाही.

नक्की विचार करा- मंत्रजप, साधना आणि देवदर्शन यांमुळे आपला फायदा होतो, देवाचा नाही!     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *