आपल्या पूर्वजांनी एक श्लोक सकाळी उठल्या उठल्या म्हणायला सांगितला आहे. तो श्लोक म्हणजे –

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।।

शब्दश: या श्लोकाचा अर्थ असा आहे की – जिने समुद्राचं वस्त्र परिधान केलं आहे, पर्वत जिची स्तनमंडले आहेत, विष्णूची पत्नी असणाऱ्या तिला मी नमस्कार करतो आणि माझ्या पायाचा स्पर्श तिला होतो आहे, त्याबद्दल मी माफी मागतो.

या श्लोकातून काय सुचवायचं असेल ते बघूया. जेव्हा आपण आपल्या आईच्या पोटात वाढत असतो, तेव्हा आपल्याला आईमार्फत ऊर्जा पोहोचवली जात असते. गर्भाशयातून बाहेर आल्यावर ती ऊर्जा आपल्याला आईच्या दुधामधून मिळते. आपण मोठे झाल्यावर ती ऊर्जा आपल्याला कशी मिळणार? तर ती मिळते समुद्राची वस्त्र परिधान केलेल्या पर्वतरूपी स्तनमंडलांमधून! अर्थात, जमिनीमधून! हेच आणखी एका गोष्टीतून सुचवलं आहे.

विष्णुपत्नी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूंच्या पायाशी बसलेली असते. हे दोघं प्रतीक आहेत ही पृथ्वी कार्यरत ठेवणाऱ्या सर्व creations आणि भूमीमधील संबंधांचं. विष्णू म्हणजे संपूर्ण सृष्टी सतत चालू रहावी यासाठी कार्यरत असणारे तत्त्व. मग प्रत्येक व्यक्ती, जी ही पृथ्वी चालू रहाण्यासाठी मदत करते आहे, तिला ऊर्जा कुठून मिळणार? तर भूमीमधून. आता आपल्या लक्षात यायला लागेल की वर्षानुवर्षे अनवाणी काम करूनही शेतकरी आजारी पडत नाहीत, कारण त्यांना दररोज भूमीतून ऊर्जा मिळत राहते. म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी जमिनीशी संपर्क आला पाहिजे.

आता या श्लोकात माफी का मागितली असावी हे बघूया. क्षमायाचना तुम्हाला ग्रहणशील बनवते. भूमीची क्षमा मागितल्याने आपल्यासाठी भूमी जिवंत होते, आपण ग्रहणशील होतो आणि अशावेळेस जेव्हा आपण भूमीवर पाय ठेवतो त्याक्षणी ऊर्जा आत यायला सुरुवात होते. तुम्ही देवळातली ऊर्जा पण डोकं खाली ठेवूनच, झुकूनच आत घेऊ शकता. हेमाडपंथी देवळांमध्ये गाभाऱ्याचे दरवाजे उंचीने लहान का असतात? यात असं सांगण्याचा प्रयत्न आहे की मूर्तीपुढे येताना वाकून या, म्हणजे तुमच्या आतलं भांडं ज्यात ऊर्जा भरून घ्यायची आहे ते उघडं होईल! तुम्हाला नाक घासायला का सांगितलंय मूर्तीपुढे? आतमध्ये सगळं उघडं होऊ दे यासाठी! क्षमा मागणे हे जर मौखिकरित्या आतमधलं भांडं रितं झाल्याचं दर्शवत असेल तर वाकल्याने देहबोलीतून तेच दिसतं, आणि मूर्तीपुढे नाक घासल्याने आतमधल्या भांड्याचं रितेपण अनेक पटींनी वाढतं.

दररोज हा श्लोक म्हणल्याने आपल्यातली ग्रहणशीलता वाढीस लागेल. यासाठी श्लोकात आधीच सोय करून ठेवली आहे – पादस्पर्श क्षमस्व मे।