खरं तर आपल्या आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर आत्मविश्वासपूर्वक काम करणं ही वाटते तेवढी अवघड गोष्ट नाही. कारण आत्मविश्वासाबद्दलची एक विलक्षण गोष्ट म्हणजे तो replicable असतो. म्हणजे काय तर, आयुष्यातील एका क्षेत्रात मिळवलेला आत्मविश्वास इतर क्षेत्रांतही वापरता येतो.
उदाहरणार्थ, सुनील गावसकर उत्कृष्ट क्रिकेटपटू होते, त्यांनी कायम आत्मविश्वासाने फलंदाजी केली. आज त्याच आत्मविश्वासाने ते क्रिकेटचं समालोचनही करतात. प्रियांका चोप्राने अभिनय करताना मिळवलेला आत्मविश्वास गायनात वापरला आणि तिचे गाण्याचे कार्यक्रमही यशस्वी झाले. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी क्रिकेटमधून मिळवलेला आत्मविश्वास जाहिरातींमध्ये काम करतानाही वापरला, व त्यांच्या जाहिरातीदेखील यशस्वी झाल्या.
हेच आहे आत्मविश्वासाचं विज्ञान.
जर तुम्हाला वाटत असेल की “मी आत्मविश्वासाने मैदानावर खेळ खेळू शकतो पण अभ्यास करताना मात्र माझ्यात आत्मविश्वास नाही,” तर एक गोष्ट लक्षात ठेवा—अभ्यासाचा आत्मविश्वास आणि खेळाचा आत्मविश्वास वेगळा नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाळेत आपण अनेकदा पाहिलं असेल की जे विद्यार्थी खेळात उत्कृष्ट असतात, ते अभ्यासातही चांगली कामगिरी करतात. कारण एका क्षेत्रात मिळवलेला आत्मविश्वास ते इतर क्षेत्रांतही वापरतात. तसंच खेळताना वापरला जाणारा आत्मविश्वास आपल्याला अभ्यास करतानाही वापरता येतो.
यासाठी आपल्या मनाला सतत सांगायला हवं, “जर मी एक गोष्ट आत्मविश्वासाने करू शकतो, तर दुसरी गोष्टही नक्कीच करू शकतो.” जर मला सायकल चालवला येते, दुचाकी चालवता येते, तर चारचाकी शिकणं माझ्यासाठी अशक्य नाही. आणि मनाला हे सांगत असताना “मला अमुक एक गोष्ट करताना आत्मविश्वास वाटतो पण तमुक एका गोष्ट करताना तो वाटत नाही” असं सांगणं टाळायचं आहे. त्याऐवजी पहिली गोष्ट करताना वाटणारा आत्मविश्वास मला दुसरी गोष्ट करताना वापरायचा आहे याचं प्रशिक्षण आपल्याला आपल्या मनाला द्यायचं आहे. आत्मविश्वास प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा नसतो; तो एकच असतो. फक्त त्याचा सर्व क्षेत्रांमध्ये वापर करायचा असतो.