समजा आपल्याला कुणाला तरी असं सांगायचंय की त्यांना जर स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या प्रतीवर त्यांचं नियंत्रण असायला हवं आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपण सांगितलेली ही गोष्ट त्यांना समजायला हवी तर त्या समोरच्या व्यक्तीला मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध असतो याविषयी थोडीतरी पूर्व-माहिती असणं गरजेचं असतं. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला एखादा विषय शिकवायचा आहे तर त्या व्यक्तीला त्या विषयाचं काहीतरी ज्ञान असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला पुरातत्वविद्येविषयी अगदीच काहीही माहिती नसेल तर त्या कार्यक्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्याला कोणते विषय निवडावे लागतील, कोणती कौशल्ये अंगी बाणवावी लागतील हे आपण सांगूच शकत नाही. कदाचित म्हणूनच जेव्हा आपण नेतृत्व किंवा कोणत्याही नेत्याच्या गुणवैशिष्ट्यांविषयी बोलतो तेव्हा नेहमीच असं म्हणलं जातं की ज्याला भलेही एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान नसेल परंतु प्रत्येक विषयाचं थोडं थोडं तरी ज्ञान असतं तोच खरा नेता होय. कारण ज्याला एखाद्या विषयाची थोडीफार तरी माहिती असते त्याला त्याविषयी अधिक जाणून घेणं सहज शक्य होते.
मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध असणं, पुरातत्वविद्या ही उदाहरणं आपण का पाहिली? आपण आपल्या आयुष्यात एखाद्या प्रसंगातून जात असतो तेव्हा या प्रसंगातून बाहेर पडायचा हा एकच मार्ग आहे अशीच जर आपली धारणा असेल तर आयुष्य जगण्याचा अजूनही सोपा मार्ग असू शकतो हे आपण स्वतःला शिकवूच शकत नाही. आपल्याला माहीत असलेल्या मार्गाव्यतिरिक्तही दुसरा अजून सोपा मार्ग, अजून सोपा उपाय असू शकतो निदान इतकं जरी आपण लक्षात घेतलं तरी मग आपण तो सोपा मार्ग समजून घेऊ शकतो.
म्हणूनच असं म्हणतात की – what we do not know even a little cannot be taught to us more!